

वर्धा : शहराच्या वेशीवर असलेल्या दत्तपूर बायपास परिसरात शिल्लक अन्न व प्लास्टिकचा कचरा खुलेआम रस्त्याच्या कडेला टाकला जात आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या भागात भीषण दुर्गंधी पसरली असून, ही घाण खाणाऱ्या जनावरांचा जीव जात आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, प्रशासनाला या समस्येचे गांभीर्य वाटत नाही. मात्र, व्हीआयपी नेत्यांचा दौरा असेल तर हाच परिसर अचानक स्वच्छ होतो आणि तेही एका रात्रीत असा अनुभव नागरिकांना येत आहे.
यापूर्वी विश्वकर्मा योजनेच्या उद्घाटनाकरिता देशाचे प्रंतप्रधान नरेंद्र मोदी हे जिल्हा दौऱ्यावर असताना हा परिसर स्वच्छ करण्यात आला होता त्यानंतर आता भाजप जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटन येत्या १२ मे रोजी होणार आहे. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहे. या पार्श्वभूमीवर येथील कचरा सफैकरिता प्रशासनाने जेसिपी लाऊन येकाच रात्री हा परिसर साफ करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना असा प्रश्न पडतो की हा कचरा जनतेला त्रास देत नाही का? केवळ व्हीआयपी लोकांनाच याचा त्रास होत असतो.
दत्तपूर बायपास हे वर्धा शहराकडे येणाऱ्या वाहनांसाठी मुख्य रस्ता आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून येथे स्थानिक खाद्यव्यवसायिक, हॉटेल्स आणि लग्नसमारंभ मंडपांमधून निघणारे शिळे अन्न आणि प्लास्टिक कचरा रस्त्यालगत टाकला जात आहे. हा कचरा उघड्यावर पडलेला असतो. त्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, थर्माकोलचे डबे, खराब झालेले अन्न, सडलेली भाज्या आणि इतर घाण असते. हे दृश्य दररोजच्या दिनक्रमात सामील झाल्यासारखे वाटते. या कचऱ्यावर कुत्री, मांजरे, गायी आणि इतर जनावरे अन्नाच्या शोधात झडती घेतात. प्लास्टिकसह अन्न गिळल्यामुळे अनेक प्राणी गंभीर आजाराने त्रस्त होत असून, काही प्राण्यांचा मृत्यू झाल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. अशा प्राण्यांचे मृतदेह देखील याच परिसरात पडून राहतात, त्यामुळे दुर्गंधी, रोगराई व अस्वच्छता वाढत आहे.
व्हीआयपीची सेवा सामान्यांसाठी दुजाभाव…
स्थानिक रहिवाशांनी अनेक अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या, तरीही येथे ना कचरा संकलनाची गाडी नियमितपणे येते, ना बोर्ड लावले गेलेत, ना कचरा टाकण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी प्रचंड असंतोष आहे. या समस्येवर तात्पुरत्या स्वच्छता मोहिमा नव्हे, तर कचऱ्याचे नियमित संकलन, सीसीटीव्हीद्वारे निरीक्षण, दोषींवर कारवाई, आणि नागरिक जनजागृती यासारख्या उपाययोजना गरजेच्या आहेत. अन्यथा, ‘व्हीआयपी’ स्वच्छता आणि सामान्य जनतेसाठी घाण, हा दुजाभाव कायम राहणार आहे.
गेल्या अनेक दिवसापासून येथे हॉटेल व्यवसायिक, केटरर्स वाले वाचलेले शिळे अन्न, प्लास्टिक या परिसरात राजरोसपणे आणून टाकतात त्यामुळे या ठिकाणी कचरा डेपो तयार होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. शिळ्या अन्नातून येथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते याचा मोठा त्रास येथून जाणाऱ्या वाहांधारकांना सहन करावा लागतो होतो. ही नित्याचीच बाब असली तरी निष्क्रिय प्रशासन याकडे कधीच लक्ष देत नाही सामान्य जनतेचे शासन – प्रशासनाला कोणतेही देणे घेणे उरलेले दिसत नाही.
सुधाकर भगत, सामाजिक कार्यकर्ते नालवाडी