वर्धा : शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल व्हॅन मद्यपी चालकाने निष्काळजीपणे चालवून थेट रस्ता दुभाजकावर जाऊन धडकली. हा अपघात बुधवारी २१ रोजी सायंकाळच्या सुमारास बढे चौक परिसरात झाला. दरम्यान, जमलेल्या नागरिकांनी मद्यपी चालकास चांगलाच चोप दिला.
पोलिसांनी याप्रकरणी नोंद घेतली. एमएच.3२ क्यू. ६०९५ क्रमांकाच्या स्कूल व्हॅन चालकाने न्यू इंग्लिश हायस्कूलमधून विद्यार्थी बसवून बोरगाव मेघे परिसराकडे जात होता. मात्र, मुख्य मार्गावर वळताच चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कूल व्हॅन थेट रस्ता दुभाजकावर जाऊन धडकली. अपघात होताच नागरिकांनी धाव घेतली असता चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समजले. नागरिकांनी सतर्कता दाखवत विद्यार्थ्यांना व्हॅन बाहेर काढून काहींनी मद्यपी चालकाला चांगलाच चोप दिला. तसेच, विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधून माहिती दिली. याची माहिती पोलिसांनाही दिली. सुदैवाने अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही.