
वर्धा : वंचित बहुजन आघाडी चे नेते एडवोकेट प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांच्या बहुजन समाज घटकातील ओबीसी, अल्पसंख्यांक, भटके विमुक्त तथा अनुसूचित जाती जमातीच्या लोकसमूहाला जागृत करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एल्गार सभा घेण्यात येत आहेत. याच पार्शवभूमीवर वर्धा जिल्ह्यातील समस्त वंचित बहुजन लोकांना सामाजिक व राजकीय दृष्टीने जागृत करण्यासाठी येत्या १८ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी २.००वाजता स्थानिक गणेश नगर, बोरगांव (मेघे) लगतच्या क्रिकेट मैदानावर महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या महाएल्गार सभेला अॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांचेसह महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर, युवा आघाडी अध्यक्ष निलेश विश्वकर्मा, अॅड. शमीभा पाटील, माजी आमदार डॉ. रमेश गजबे, कुशल मेश्राम, निशाताई शेंडे आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १८ फेब्रुवारी १९२७ याच दिवशी मुंबई कौन्सिलच्या अधिवेशनात दलित आणि बहिष्कृत वर्गांच्या लोकांवरील अन्याय दूर करण्यासाठी आमदारकीची शपथ घेऊन त्यानंतर संवैधानिक रूपाने प्रखर लढा उभारला होता. या दिवसाचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता वंचित बहुजनांची महाएल्गार सभा वंचित बहुजन आघाडी, वर्धा जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आली असून या महाएल्गार सभेला मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वर्धा जिल्हा प्रभारी बंडू नगराळे, विदर्भ समन्वयक किशोर खैरकार, युवा जिल्हाध्यक्ष आशिष गुजर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून कळवीले आहे.



















































