
समुद्रपूर : बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनची मळणी झाली असून आता शेतकरी रब्बीच्या तयारीला लागले आहेत. अशातच तालुक्यातील निरगुडी येथील शेतामध्ये ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटाव्हेटर सुरू असताना चालकाचा अचानक तोल गेला. तो ट्रॅक्टरवरून खाली पडला आणि त्याच्या अंगावरून रोटाव्हेटर गेला. यात चालकाचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
पुरुषोत्तम देवराव धोटे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. निरगुडी येथील शेतकरी निलेश धोटे यांनी त्यांच्या शेतात रब्बी हंगामाकरिता शेतीच्या मशागतीसाठी रोटाव्हेटर यंत्र असलेला ट्रॅक्टर बोलावला. ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटाव्हेटर करीत शेतीची मशागत सुरू असताना अचानक ट्रॅक्टरचालक पुरुषोत्तम धोटे याचा ट्रॅक्टरवरून तोल गेल्याने तो खाली पडला. लागलीच ट्रॅक्टरचे मोठे चाक त्याच्या अंगावरून जाऊन पाय रोटाव्हेटरमध्ये अडकले. यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. घटना बघण्याकरिता गावातील नागरिकांची शेतामध्ये मोठी गर्दी उसळली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदमासाठी रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी समुद्रपूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. पुढील तपास पोलिस करीत असून या घटनेने गावातच नाही तर आजुबाजुच्या परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.





























































