
वर्धा : घरातील पलंगावर निपचित पडून असलेल्या विवाहितेचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. तिच्या गळ्याला खरचटल्याचे निशाण असल्याने घरच्यांनी याबाबत तळेगाव पोलिसात जात नेमका मृत्यू कशाने झाला हे तपासण्याची मागणी दिलेल्या तक्रारीतून केली. तळेगाव पोलिसांनी याप्रकरणी मर्ग दाखल केला असून शवविच्छेदन अहवाल आल्यानेतर हे स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक आशिष गझबिये यांनी दिली.
मेघा गौरिशंकर ढोबाळे (२१, रा. जसापूर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. सुनीता अजांब बोबडे (रा. देववाडी) या कुटुंबासह घरी असताना जावई गौरीशंकर ढोबाळे हा घरी आला. रात्री गौरीशंकर घरी परतल्यावर त्याने सुनीता बोबडे यांना फोन करुन मेघाला काही तरी झाले आहे, तुम्ही लवकर या, असे म्हटले. दरम्यान सुनीता बोबडे ही पती व मुलांसह मेघाच्या घरी गेले असता मेघा ही पलंगावर निपचित पडून असलेली दिसून आली. तिची पाहणी केली असता तिच्या गळ्यावर खरचटल्याचे निशाणं दिसून आले. त्यामुळे मेघाचा मृत्यू कशाने झाला हे समजले नसल्याने सुनीता बोबडे यांनी याबाबतची तक्रार तळेगाव पोलिसात दिली. यासंदर्भात पोलिस निरीक्षक आशिष गजभिये यांना विचारणा केली असता त्यांनी तपास सुरू असून शवविच्छेदन अहवाल आल्यावर नेमका मृत्यू कशाने हे माहिती पडेल, असे सांगितले.

















































