

वर्धा : देवाल्यातील मेणबती व जळता दिवा खाली पडून भडका उडाल्याने फ्लॅटला आग लागून दोन रूम जळून खाक झाल्या. ही घटना वर्धा शहरानजीकच्या सावंगी मघे परिसरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या आदित्य रेसिडेन्सीमध्ये गुरुवार 14 एप्रिल रोजीच्या दुपारच्या सुमारास घडली. आगीची माहिती मिळताच वर्धा नगरपालिकेच्या अग्नीशमन दलाने काही वेळातच घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत फ्लॅटमधील साहित्य जळून राख झाले. फ्लॅटमध्ये कोणीही नसल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
येथील आदित्य रेसीडेस्नीमधील पहिल्या माळ्यावरील 105 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये भारतीय सेन्यदलातून सेवानिवृत्त झालेले मंगेश ढवळे हे किरायाने राहतात. ते पुलगाव येथील निवासी असून, यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे अन्नसुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी सकाळी ढवळे यांनी 14 एप्रिल असल्यामुळे त्यांनी घरी दिवा व मेणबत्ती पेटविली होती. घरी पूजन करून ते परिवारासह पुलगाव येथे गेले होते. बंद फ्लॅटमधून दुपारी 2 वाजताच्या सुमरास धुराचे लोळ बाहेर येताना दिसले त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तातडीने सावंगी पोलिसांना तसेच वर्धानगरपालिकेच्या अग्नीशमन दलाला माहिती दिली. माहिती मिळताच कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आगीमुळे सर्व फ्लॅटचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाला तारेवरची कसरत करावी लागली. या आगीमध्ये बेडरूममधील साहित्य, कपडे, पुस्तके यासह इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू जळून खाक झाल्या.