

वर्धा : नजीकच्या म्हसाळा ग्रामपंचायत परिसरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाईपलाईन फुटल्याने नळाला दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे तत्काळ दुरुस्ती करावी, या मागणीकरिता ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी जीवन प्राधिकरणच्या कार्यालयावर धडक देऊन कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले.
पाईपालाईन फुटल्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. नागरिकांच्याही तक्रारी वाढत असल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पाईपलाईन दुरुस्त करावी. या मागणीकरिता कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदन देताना म्हसाळ्याच्या सरपंच मंगला काचोळे, उपसरपंच संदेश किटे यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंता चंद्रिकापुरे, उपअभियंता थूल यांना निवेदन दिले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अनिल उमाटे, कांता भगत, वंदना झामरे, सारिका वानखेडे, माजी उपसरपंच दीपक चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम बावणे, भानुदास दातारकर, ईश्वर काचोळे, छबिराज येवतीकर व सुनील ढाले यांची उपस्थिती होती.