

वर्धा : अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष देत तसेच स्वत: आत्महत्या करण्याची धमकी देत बळबजरी अत्याचार केल्याची घटना देवळी नजीकच्या एका गावात घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून देवळी पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती दिली. संकेत दिलीप पाल (२३) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी संकेतने अल्पवयीन मुलीशी जवळीक निर्माण करुन तिला लग्नाचे आमिष दिले. तिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित करुन शारीरिक संबंध ठेवण्याची गळ घातली. मात्र, पीडितेने नकार दिला असता आरोपी संकेतने आत्महत्या करण्याची धमकी देत बळजबरी पीडितेचे लैंगिक शोषण केले. नराधम इतक्यावरच थांबला नसून दोघांचे एकत्रित फोटो मोबाईलमध्ये घेऊन ते फोटो पीडितेच्या नातेवाईकांच्या व्हॉटसअँपवर पाठवून तिची बदनामी केली. अखेर पीडितेने ही बाब घरी सांगितली असता थेट देवळी ‘पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ पोलीस पथक रवाना करुन आरोपी संकेतला बेड्या ठोकल्या.