

वर्धा : देवळी तालुक्यातील भिडीनजीकच्या चोंडी शिवारात थेट काळविटाची शिकार करून त्याच्या मांसाची मेजवानी केली जात असल्याची माहिती मिळताच वर्धा वनविभागाने धडक कारवाई करून चौघांना ताब्यात घेतले. या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून काळविटाची कातडी व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
वन्यजीवांची शिकार करणे हे कायद्यान्वये गुन्हा आहे. असे असले तरी देवळी तालुक्यातील चोंडी शिवारात अवैधपणे काळविटाची शिकार करून काळविटाच्या मांसची मेजवानी केली जात असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रूपेश खेडकर यांना मिळाली. त्यानंतर वर्धा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रूपेश खेडकर, माधव माने, सारंग कोठेवार, अशपाक पठाण, प्रशांत कमिटी व कुकडे यांच्या चमूने शुक्रवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास देवळी तालुक्यातील चोंडी शिवार गाठून काळविटाच्या मांसाची मेजवानी करीत असलेल्या विश्वेश्वर हरिभाऊ सोनटक्के, नागसिंग संजय वाघमारे, रंजित जगदीश टामठे व सुरेंद्र लक्ष्मण दांढेकर, सर्व रा. चोंडी यांना ताब्यात घेत अटक केली. या चारही आरोपींना अटक करून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पुलगाव येथील न्यायालयात हजर केले असता या चारही आरोपींना सात दिवसांची वनकोठडी ठोठावली आहे. तर फरार असलेल्या आरोपींचा शोध सध्या घेतला जात आहे.