
तळेगाव (श्या.पंत.) : पेट्रोल पंपावरून इंधन भरून महामार्ग ओलांडताना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दुचाकी चालक ईश्वरसिंग ऊर्फ बंटीसिंग बावरी याने आपल्या ताब्यातील एम. एच. 3० बी. के. १२८२ क्रमांकाची दुचाकी समोरून येणाऱ्या मालवाहूवर चढविली. यात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला, हा अपघात नागपूर.अमरावती महामार्गावरील आष्टी टि-पाईंटवर परिसरात शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास झाला.
ईश्वरसिंग ऊर्फ बंटीसिंग ददारसिंग बावरी हा मूळचा देवीखदान अकोला येथील रहिवासी आहे. तो त्याच्या ताब्यातील दुचाकी घेऊन आष्टी टि-पॉईंट परिसरात आला असता मद्यधुंद अवस्थेत त्याने समोरून येणाऱ्या एम, एच. 3० बी. डी. २५५१ क्रमांकाच्या मालवाहूला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा चुराडाच झाला, तर मालवाहूचा पुढील भाग चपकला.
अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांसह तळेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठले. शिवाय जखमीला रुग्णालयाकडे रवाना केला, पण वाटेतच गंभीर जखमीची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी तळेगाव पोलिसांनी मालवाहूचालक शेख असलम रा. मूर्तीजापूर याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास राजू शाहू, संदीप महाकाळकर करीत आहेत.
























































