

वर्धा : जमीन खरेदी प्रकरणात आरोपीने फिर्यादीची 16 लाख रुपयांनी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आरोपी महिला शीतल नरेंद्र उभाट रा. वर्धा हिच्यासह अजय रमेश भुते रा. वर्धा याच्याविरुद्ध हिंगणघाट पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील फिर्यादी विकास हरिनारायण शाहू (वय 42) रा. संत तुकडोजी वॉर्ड, हिंगणघाट यांनी आरोपी शीतल नरेंद्र उभाट व अजय रमेश भुते यांच्यासबोत मध्यस्थीने 16 मार्च 2020 रोजी आरोपीच्या 2.42 आर जमिनीचा सौदा 22 लाख रुपयांत हिंगणघाट येथे ठरला. त्यानंतर खरेदीची तारीख 8 एप्रिल 2021 च्या अगोदरची ठरली, त्यामुळे फिर्यादीने खरेदीची कागदपत्रे तयार करून आरोपीकडे गेले. आरोपींना 9 लाख 50 हजार रुपयांचे आरटीजीएस व 5 लाख 50 हजार रुपये आरोपीचे हस्ते आरोपी क्रमांक 1 च्या खात्यात जमा केले. तसेच विसारावर दिलेले 1 लाख असे एकूण 16 लाख रुपये दिले. व बाकी खरेदीवर देण्याचे ठरल्यानुसार रजिस्टर कार्यालयात फिर्यादी हजर झाले.
परंतु, आरोपी विक्री करण्यास गैरहजर राहिले पुन्हा 12 एप्रिल 2021 रोजी खरेदी करून देण्याचे फिर्यादीला सांगून विश्वास संपादन केला. परंतु, खरेदी करून न दिल्याने यातील आरोपींनी फिर्यादीची 16 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी विकास शाहू यांच्या तक्रारीवरून शीतल नरेंद्र उभाट रा. वर्धा व अजय रमेश भुते रा. वर्धा या दोघांविरुद्ध हिंगणघाट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक टापरे हे करीत आहेत.