अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस सश्रम कारावास! अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ यांनी सुनावली शिक्षा

वर्धा : अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास सश्रम कारावासाची शिक्षा आणि पाच हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे. हा निर्वाळा अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ व्ही. टी. सुर्यवंशी यांनी शुक्रवारी दिला.

गोविंद धनराज काळे (3६) रा. वाठोडा-हैबतपूर पुनर्वसन, ता. आर्वी, असे आरोपीचे नाव आहे. पीडिता तिच्या आजीच्या घरी झोपलेली असताना २० जुलै २०१७ रोजी आरोपीने तिच्या घरात प्रवेश करुन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ती आरडाओरड करु नये म्हणून तिच्या तोंड हाताने दाबून ठेवले. इतकेच नाही तर तिला पैशाचे प्रलोभन
दाखवून घराबाहेर बोलावण्याचाही प्रयत्न केला. या घटनेमळे घाबरलेल्या पीडितेने लागलीच हा प्रकार आजीला सांगितला.

दुसऱ्या दिवशी याबाबत आईला माहिती देऊन पीडितीने आई-वडिलासोबत आर्वी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक धीरज बांडे यांनी याप्रकरणी तपास करुन आरोपीला अटक केली. तसेच सबळ पुराव्यांसह न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणी अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ व्ही.टी. सुर्यवंशी यांनी आरोपीस बाल लैगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तीन वर्षाचा सश्रम कारावास आणि ५ हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिन्याचा सश्रम कारावास तसेच कलम ४५१ भा.द.वि. अंतर्गत दोन वर्षांचा सश्रम कारावास आणि १ हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास अतिरीक्त एक महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच पीडितेला पाच हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचेही आदेश दिले आहे.

शासनातर्फे विशेष सरकारी वकील विनय घुडे यांनी कामकाज पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार अजय खांडरे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here