विद्यार्थ्यांना पेपर देताना मास्क किंवा सॅनिटायझर बाळगण्याची परवानगी

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर

नागपूर:- दहावी आणि बारावीच्या परीक्षांना येणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपर देताना मास्क किंवा सॅनिटायझर बाळगण्याची परवानगी देण्यात आली आहे. नागपुरातील सर्व परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना ही सूट देण्यात आली आहे.

सध्या शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर दहावी आणि बारावीच्या शालांत परीक्षा सुरू आहेत. या केंद्रांवर विद्यार्थ्यांना कोणत्याही इतर अनावश्यक वस्तू नेण्याची परवानगी नाही. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर या नियमात सूट देण्यात आली आहे. परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वत:बरोबर मास्क, सॅनिटायझर किंवा हॅण्डवॉशसारख्या वस्तू बाळगता येतील. करोनाचा संसर्ग होऊ नये आणि वैयक्तिक स्वच्छता राखली जावी, याकरिता विद्यार्थ्यांना ही मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार अनेक केंद्रावर विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान या वस्तू बाळगू देण्यात आल्या.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने शालांत परीक्षेचे आयोजन आणि नियंत्रण केले जाते. मात्र, परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना हात धुणे किंवा इतर सुविधांबाबत सोयी करून देण्यासंदर्भात अद्याप आदेश देण्यात आलेले नाहीत. राज्याकडून असे कोणतेही आदेश आलेले नाहीत. मात्र, शाळांनी स्वत: याकरिता पुढाकार घेतला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविल्या पाहिजेत, असे नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी सांगितले.

  • शाळांना सुट्या

करोनाचा लहान मुलांना प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी शाळांना राज्य शासनाने सुट्या दिल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाऊन मुलांना त्रास किंवा संसर्ग होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. मात्र, शासनाच्या या प्रयत्नांवर पाणी फिरविण्याचे काम काही पालक करीत असल्याचे दिसून आले आहे. या सुट्यांचे निमित्त साधून पालकांनी सहलींचे बेत आखले आहेत. शेगावपासून विविध ठिकाणी पालक मुलांना घेऊन सहलीला गेल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here