Home ◼️ संपादकीय हिंगणघाटात अवैध दारूवर धडक कारवाई ; १.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगणघाटात अवैध दारूवर धडक कारवाई ; १.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त

वर्धा : स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांच्या पथकाने हिंगणघाट पोलिस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्रीवर धडक कारवाई करत १ लाख ७८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विठ्ठल मंदिर वॉर्ड परिसरात टाकण्यात आलेल्या छाप्यात ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २७ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हिंगणघाट परिसरात पेट्रोलिंग करत असताना विठ्ठल मंदिर वॉर्ड येथे अवैध दारूचा साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून विक्की चौधरी यांच्या घरावर छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी विक्की चौधरी घटनास्थळावरून पसार झाला. मात्र, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारू व बिअरचा साठा आढळून आला.

या कारवाईत पोलिसांनी विविध प्रकारचा मुद्देमाल जप्त केला असून त्यामध्ये रॉयल स्टॅग विदेशी दारू १४४ शिश्या (किंमत ५०,४०० रुपये), प्रिमियम ब्रँड देशी दारू ६०० शिश्या (किंमत ६०,००० रुपये), ट्युबॉर्ग बिअर १०५ बॉटल (किंमत ३७,४५० रुपये), किंगफिशर बिअर ३५ बॉटल (किंमत १५,७५० रुपये) तसेच अन्य साहित्याचा समावेश आहे. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत १,७८,६०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आरोपी विक्की चौधरी याच्याविरुद्ध हिंगणघाट पोलिस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कलम ६५ (ई), ८३ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई वर्धा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक श्री. मुरलीधर बाचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकात पो.ह.वा. अमरदास पाटील, दीपक जंगले, पवन नामदेव, पो.शि. रितेश कुंडलकर आणि मंगेश अडे यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!