
पुलगाव : बैलबंडीला वाचविण्याच्या नादात पुणे येथे जात असताना समोर असलेली बैलबंडी वाचविण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर लगतच्या नाल्यात जाऊन पलटला. हा अपघात शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास रामटेके लेआउट परिसरात घडला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही.
एम.एच.१२ – एन.एक्स, ९३३३ क्रमांकाचा गॅस टँकर हा पुणा येथील चाकण येथून गॅस भरून नागपूर येथील खापरी येथे गॅस स्टेशनवर गेला होता. तेथून गॅस रिकामा करून टँकर पुन्हा पुणे येथे जात होता. दरम्यान, नागपूर-औरंगाबाद घोटी महामार्गावर रामटेके लेआउट परिसरात समोरून एक बैलबंडी येताना दिसली. बैलबंडीला वाचविण्याच्या नादात टँकर चालक मोहम्मद शकील अमनुल्लाहे कुरेश (रा. कोडखेड, प्रतापगड, उत्तर प्रदेश) याचे स्टेअरिंगवरून नियंत्रण सुटल्याने टँकर नाल्यात पलटला.
पुलगावजवळील या वळण रस्त्यावर यापूर्वीही अनेकदा अपघात झालेले आहेत. अनेक वर्षांपासून हे वळण धोकादायक ठरत असून, याकडे राज्य महामार्ग, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांकडून करण्यात आला. या रस्त्यावर यापूर्वी गतिरोधक बांधले होते म्हणून अपघाताला काहीसा ब्रेक लागला होता. मात्र रस्त्यावर डांबरीकरण केल्याने गतिरोधक समतोल झाले असून, वाहने वेगाने जात असल्याने अपघातांची शक्यता बळावली आहे.

















































