

वर्धा : बाजारपेठेत गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्या वरच्या खिशातून मोबाईल चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलिसात हरविलेल्या मोबाईलबाबतच्या दररोज २५ च्या वर तक्रारी प्राप्त होतात. पोलिसांनाही मोबाईल शोधण्यास मोठ्या अडचणी येतात. मात्र, पोलिसांकहून अनेक मोबाईलचा शोध घेतल्या गेला असून संबंधित नागरिकांना हरविलेले मोबाईल देण्यातही आले आहे. मात्र, नागरिकांनी बाजारपेठेते आणि गर्दीच्या ठिकाणी जाताना सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहरासह जिल्ह्यात मोबाईल चोरल्याच्या आणि हरविल्याच्या अनेक घटना घडत आहेत. याबाबत संबंधित व्यक्ती पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलकडे तक्रारी करतात. तर काही जण ऑनलाईन पद्धतीने देखील तक्रारी करतात. या तक्रारींची पोलिसांकडून दखल घेण्यात येते. संबंधित मोबाईलचा आयएमईआय क्रमांक ट्रेस केला जातो. जर मोबाईल सुरु असेल तर मोबाईल मिळण्यास अडचण येत नाही. मात्र, मोबाईल बंद राहिल्यास
त्या मोबाईलचा शोध घेण्यास मोठ्या अडचणी निर्माण होतात.
यापूर्वीही पोलिसांनी हरविलेल्या मोबाईलचा शोध घेऊन नागरिकांना परत देत दिलासा दिला. २०१९ मध्ये १०९७ तर २०२० मध्ये ६६५ मोबाईल हरविल्याच्या तक्रारी दाखल आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्याच्या कालावधीत तब्बळ ८५ मोबाईल हरविल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या असून यापैकी काही मोबाईल पोलिसांनी शोधून काढले आहेत. अजूनही पोलिसांकडून हरविलेले किंवा चोरी गेलेल्या मोबाईलचा शोध घेणे सुरु आहे.