
वर्धा : येथील पंचायत समितीच्या पेन्शन विभागातील कर्मचाऱ्याच्या अक्षम्य चुकीमुळे एका ७२ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षिकेसह इतर चार सेवानिवृत्तांना मोठा मनस्ताप सहन करावा लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पेन्शन विभागाने पाचजणांची पेन्शन रक्कम एकाच खात्यात जमा केल्याने सर्व गोंधळ उडाला. यामुळे वृद्ध सेवानिवृत्त शिक्षिकेला भर उन्हात वर्धा गाठावी लागली, तर चौघांना पेन्शनकरिता कार्यालयाच्या चकरा माराव्या लागल्या.
वर्धा पंचायत समितीतील पेन्शन शाखेतून दरमहा सेवानितृत्तांच्या बँक खात्यात पेन्शनची रक्कम जमा केली जाते. दि. ७ एप्रिल रोजी पेन्शन विभागातील कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे तब्बल पाच सेवानितृत्तांची पेन्शन रक्कम एकाच खात्यावर वळती झाली, ही सर्व रक्कम सेवानितृत्त शिक्षिका मंदाबाई ठाकरे यांच्या बँक खात्यात जमा झाली. त्यामुळे इतर चार सेवानिवृत्त नागरिक आपल्या हक्काच्या पेन्शनच्या प्रतीक्षेत राहिले. पण, खात्यात जमा झालेली रक्कम परत करण्यासाठी वृद्ध सेवानिवृत्त शिक्षकेसह त्यांच्या परिवारातील सदस्यांना नाहक त्रास सहन करावा लागल्याने पंचायत समितीच्या या भोंगळ कारभाराबद्दल रोष व्यक्त केला. तसेच पेन्शनधारकांनी दरमहा आपली पेन्शन खात्यात जमा झाली की नाही, याची शहानिशा करावी, असेही या अनुभवातून मंदाबाईच्या परिवाराने सांगितले.
भर उन्हात सेवानिवृत्त शिक्षिकेने अपरावतीवरुन गाठली वर्धा
कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे एकाच खात्यात रक्कम वळती झाल्याने पंचायत समितीच्या कार्मचाऱ्याने तातडीने मंदाबाई यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. तसेच ही रक्कम वळती करण्यास बँकेने नकार दिल्याने तुम्ही वर्ध्यातील बँकेत येण्याच्या सूचना केल्या. मंदाबाई त्याच्या मुलाकडे गोव्याला राहतात. मात्र, एका विवाहसोहळ्यास त्या अमरावती येथे आल्या होत्या अखेर प्रशासनाचा फोन आल्न्याने त्यांनी परिवारातील सदस्यासह शुक्रवारी सकाळीच वर्ध्यांतील बँक गाठली.
पंचायत समितीचा ना कर्मचारी पोहाचला, ना बँकेने स्वाक्षरी घेतली
पेन्शन विभागातील कर्मचाऱ्याने फोन केल्यामुळे ७२ वर्षीय वृद्ध मंदाबाई प्रस सहन करत वर्थ्यातील बँकेत पोहोचल्या. पण, बँकेत कोणतीही स्वाक्षरी न घेता त्यांना परत जाण्यास सांगितले. तर संबंधित कर्मचारीही कुठेही दिसून आला नाही. त्यापुळे पंचायत समितीच्या या ढिसाळ कारभारामुळे आणि कर्मचाऱ्यांच्या असंवेदनशील वर्तणुकीमुळे संताप व्यक्त होत आहे.




























































