
वर्धा : शहरातील गोपुरी चौक परिसरात रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेला कचरा जाळल्यामुळे भीषण आग लागल्याची घटना आज सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. सुरुवातीला किरकोळ स्वरूपात असलेली आग काही वेळातच वाऱ्याच्या जोरावर भडकली आणि परिसरातील लाकडी बांबू, वाळलेले गवत तसेच कचऱ्याला आग लागल्याने परिस्थिती गंभीर बनली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यालगत असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला कुणीतरी आग लावली होती. सुरुवातीला धूर निघत असल्याचे दिसून आले; मात्र काही मिनिटांतच आगीने मोठे रौद्ररूप धारण केले. परिसरात मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेले बांबू, लाकूड आणि ज्वलनशील कचरा यामुळे आगीने झपाट्याने फैलाव घेतला. वाऱ्यामुळे आगीच्या ज्वाळा आणखी भडकल्या आणि काही वेळ परिसर धुराच्या विळख्यात गेला होता.
आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात उसळत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा आणि बांबू साहित्य साठवून ठेवले जात असल्याने भविष्यात आणखी मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान, या आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.


























































