
वर्धा : महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या निर्णायक टप्प्यात सेवाग्राम आश्रमातून ग्रामस्वराज्य, स्वावलंबन आणि अहिंसेचा संदेश देशभर पोहोचविला, तर आचार्य विनोबा भावे यांनी पवनार आश्रमातून भूदान व सर्वोदयाची व्यापक चळवळ उभारली. या दोन्ही विचारप्रवाहांमुळे वर्धा जिल्हा राष्ट्रीय विचारांचे केंद्रबिंदू ठरला असून, या वारशाच्या बळावर सेवाग्राम–वर्धा परिसरातील पर्यटनाला नवी दिशा मिळू शकते, असे प्रतिपादन डॉ. रवींद्र बेले यांनी केले. वर्धा जिल्हा पर्यटन व पर्यटक प्रमाणपत्र वितरण समारंभात भूगोल व इतिहास विषयाच्या विद्यार्थ्यांना अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर समन्वयक डॉ. बुद्धघोष लोहकरे, डॉ. नरेश कवाडे, प्रा. सचिन वागदे उपस्थित होते.
डॉ. बेले पुढे म्हणाले, पर्यटन क्षेत्रात युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होत असून विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहण्याची गरज आहे. प्राचार्य डॉ. गिरीश ठाकरे यांच्या प्रेरणेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. समन्वयक डॉ. बुद्धघोष लोहकरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, इतिहास, संस्कृती आणि परंपरेचे जतन करणारे प्रभावी माध्यम म्हणून पर्यटन क्षेत्र उदयास येत आहे. योग्य नियोजन केल्यास पर्यटन मार्गदर्शक, निवास व्यवस्था, हस्तकला, प्रवास सेवा व डिजिटल माध्यमांद्वारे युवकांना रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात.
डॉ. नरेश कवाडे यांनी वर्धा जिल्ह्याच्या ऐतिहासिक, राजकीय व सांस्कृतिक वैभवाचा आढावा घेताना सेवाग्राम, पवनार आश्रम तसेच बोर अभयारण्य या स्थळांनी जिल्ह्याला पर्यटन नकाशावर विशेष स्थान मिळवून दिल्याचे सांगितले. या प्रसंगी डॉ. रवींद्र बेले, डॉ. बुद्धघोष लोहकरे, डॉ. नरेश कवाडे व प्रा. सचिन वागदे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. चंद्रकांत राडे, डॉ. संजीवनी पाटील, प्रा. सुवर्णा कांबळे, प्रा. ज्योत्स्ना कोडापे, प्रा. योगिता मानमोडे, प्रा. रूपल अंबाडकर, प्रा. मेघराज आत्राम आदी प्राध्यापकांचे मान्यवरांनी कौतुक केले. कार्यक्रमाची भूमिका प्रा. सचिन वागदे यांनी मांडली. सूत्रसंचालन प्रा. रूपल अंबाडकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. योगिता मानमोडे यांनी केले.


























































