Home जिल्हा वर्धा पवनारमध्ये सेंद्रिय केळी बाग जळून खाक ; प्रगतिशील शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

पवनारमध्ये सेंद्रिय केळी बाग जळून खाक ; प्रगतिशील शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

पवनार : परिसरात गुरुवारी (दि. १ मे) दुपारी लागलेल्या आगीत प्रगतिशील शेतकरी शिशिर राऊत यांची ऑर्गनिक केळी बाग पूर्णतः जळून खाक झाली. या घटनेत सुमारे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे तीनच्या सुमारास शेतालगत काडीकचरा जाळण्यात येत असताना आग भडकली. उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमुळे वाऱ्याच्या वेगाने ही आग झपाट्याने पसरत राऊत यांच्या शेतात शिरली. शेतात साठवून ठेवलेल्या सेंद्रिय खतासाठीच्या काडीकचऱ्यालाही आग लागल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आणि संपूर्ण केळी बाग आगीच्या कवेत सापडली.

शिशिर राऊत हे परिसरात नवनवीन प्रयोग करणारे प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. त्यांनी रासायनिक खतांचा वापर टाळत पालापाचोळा व काडीकचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करून केळी पिकासाठी वापरण्याचा उपक्रम सुरू केला होता. पर्यावरणपूरक शेतीच्या या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत असतानाच आगीच्या घटनेने त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले. केळी बागेचे संरक्षण व्हावे यासाठी राऊत यांनी शेताभोवती एरंडी, सावर यांसारखी हिरवी झाडे लावली होती. मात्र आगीच्या तीव्रतेपुढे ही संरक्षणरेषाही निष्फळ ठरली. सुमारे एक एकर क्षेत्रावरील केळी पीक काही क्षणांत जळून खाक झाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व शेतकरी मदतीसाठी धावले. आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र आगीचा वेग प्रचंड असल्याने मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने काडीकचरा जाळताना विशेष काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेचा तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकरी शिशिर राऊत यांना शासनाकडून योग्य ती नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!