

वर्धा : शहरात आयपीएल लाईव्ह क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या बुकीवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत तब्बल 1 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांविरुद्ध जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 25 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वर्धा शहरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती मिळाली की, पुलफैल परिसरातील रहिवासी अविनाश मतेलकर हा आपल्या साथीदारासह घरातून राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या आयपीएल सामन्यावर सट्टा जुगार चालवत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत संबंधिताच्या राहत्या घरी छापा टाकला.
या कारवाईत आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन सामन्यावर हार-जीत लावताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 5 हजार रुपये रोख, दोन मोबाईल फोन (किंमत 1 लाख 35 हजार रुपये) व इतर साहित्य असा एकूण 1 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषसिंग ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग गोमलाडू तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.



























































