Home जिल्हा वर्धा उन्हाळ्यात मुक्या जीवांसाठी ‘फलाआहार’ उपक्रम ; करुणाश्रमची संवेदनशील पुढाकार

उन्हाळ्यात मुक्या जीवांसाठी ‘फलाआहार’ उपक्रम ; करुणाश्रमची संवेदनशील पुढाकार

पवनार : उन्हाळ्यात तापमान झपाट्याने वाढत असताना माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही उष्णतेचा मोठा फटका बसत आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, उष्माघाताचा धोका, भूक मंदावणे अशा विविध समस्यांना प्राण्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पवनार येथील करुणाश्रमने मुक्या जीवांसाठी ‘फलाआहार’ उपक्रम राबवत त्यांची विशेष काळजी घेतली आहे.

करुणाश्रममध्ये आश्रय घेतलेल्या गायी, कुत्रे, पक्षी व इतर प्राण्यांसाठी दररोज मधुर आणि पचायला हलकी फळे, ताजी भाज्या तसेच थंडगार पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. उष्णतेमुळे प्राण्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत असल्याने त्यांना पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थ मिळावेत, यासाठी विशेष नियोजन केले गेले आहे.

संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, उन्हाळ्यात प्राण्यांना साधा चारा देण्याबरोबरच कलिंगड, काकडी, टरबूज, केळी यांसारखी पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे देण्यात येत आहेत. त्यामुळे प्राण्यांना उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळत असून त्यांचे आरोग्यही चांगले राहत आहे. तसेच परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याची भांडी ठेवून भटक्या प्राण्यांसाठीही पाण्याची सोय करण्यात आली आहे.

उन्हाळ्याच्या काळात अनेकदा पाण्याअभावी किंवा अन्नाअभावी प्राणी अशक्त होतात. काही वेळा उष्माघातामुळे त्यांचा जीवही धोक्यात येतो. अशा परिस्थितीत करुणाश्रमसारख्या संस्थांचा पुढाकार हा समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. या उपक्रमातून ‘मुक्या जीवांचीही काळजी घ्या’ हा संदेश देण्यात येत आहे.

दरम्यान, नागरिकांनीही आपल्या परिसरात पक्षी व प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी, तसेच शक्य असल्यास फळे व अन्न देऊन त्यांना आधार द्यावा, असे आवाहन करुणाश्रमच्या वतीने करण्यात आले आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्राण्यांच्या संवर्धनासाठी आणि त्यांच्या आरोग्य रक्षणासाठी अशा उपक्रमांची गरज अधिक अधोरेखित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!