

वर्धा : शहरासह संपूर्ण जिल्ह्यात लहान-मोठ्या चोरीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले आहे. दुचाकी चोरी, मोबाईल हिसकावणे, घरफोड्या यांसारख्या गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेषतः दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, दररोज किमान तीन ते चार दुचाकी चोरीस जात असल्याचे चित्र आहे. या प्रकरणांची पोलिसात नोंद होत असली तरी चोरीस गेलेली वाहने क्वचितच परत मिळतात, ही चिंतेची बाब ठरली आहे.
शहरातील मंदिरे, हॉटेल्स, ढाबे तसेच घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकींवर चोरट्यांची नजर असते. काही ठिकाणी तर दिवसाढवळ्या वाहन चोरीच्या घटना घडत आहेत. पोलिसांकडून तपास पथके स्थापन करून कारवाई केली जात असली तरी मूळ साखळीपर्यंत पोहोचण्यात अडथळे येत असल्याचे दिसून येते.
दरम्यान, चोरी झालेल्या दुचाकींचे सुटे पार्ट काढून विक्री करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे चोरीच्या घटनांना चालना मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे. यावर उपाय म्हणून केवळ चोरट्यांवर कारवाई करून चालणार नाही, तर चोरीचा माल विकत घेणाऱ्यांवरही कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे. कायद्यात त्याबाबत तरतूद असतानाही अशा खरेदीदारांवर अपेक्षित ती कारवाई होत नसल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
चोरीचा माल खरेदी करणाऱ्यांनाही आरोपी ठरवून गुन्हे दाखल केल्यासच या साखळीला आळा बसू शकतो. अन्यथा चोऱ्या, घरफोड्या आणि चेन स्नॅचिंगसारख्या घटना थांबणे कठीण असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

























































