

वर्धा : जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वाढत्या व्यवहारावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक भूमिका घेतली असून, त्याचाच प्रत्यय काल समुद्रपूर तालुक्यात पाहायला मिळाला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रचलेल्या सापळ्यात दोन आरोपींना रंगेहात पकडत मोठी कारवाई केली. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर 19 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समुद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, मुखबिराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार मौजा कानकाटी चौक, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 येथे सापळा रचण्यात आला. या कारवाईदरम्यान प्रवासी ऑटो (क्र. MH-49 CF-3611) थांबवून तपासणी केली असता, आरोपी शेख अलीम शेख रमजान (वय 62, रा. आदर्श नगर, नागपूर) सत्तार खान गौस खान (वय 57, रा. पाचपावली, नागपूर) हे दोघे गांजा विक्रीसाठी वाहतूक करताना रंगेहात पकडले गेले.
पोलिसांनी आरोपींकडून 2 किलो 101 ग्रॅम गांजा, ऑटो आणि मोबाईल असा एकूण 4 लाख 12 हजार 525 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध समुद्रपूर पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पथकात उपनिरीक्षक प्रकाश लसुंते व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
जिल्ह्यात अंमली पदार्थांविरुद्ध अशीच कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
























































