

कारंजा : तालुक्यातील पांजरा गोंडी येथे शेतकरी विजय साठे यांच्या शेतातील कच्च्या घराला लागलेल्या भीषण आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. या घटनेत साठे यांच्या घराची राखरांगोळी झालेली आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
बुधवार (दि.१५) रोजी दुपारच्या सुमारास साठे यांच्या शेतातील घराला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरातील सर्व साहित्य जळून नष्ट झाले. घरात साठवलेले धान्य, शेतीची अवजारे तसेच दैनंदिन वापरातील वस्तू पूर्णपणे राख झाली.
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. उपलब्ध साधनसामग्रीच्या मदतीने आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला. मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्याने मोठे नुकसान होऊनच आग नियंत्रणात आली.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, शेतकरी विजय साठे यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. दरम्यान, प्रशासनाकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला. यावेळी ग्राममहसूल अधिकारी आर. बी. शिराळे व मंडळ अधिकारी आर. पी. राठोड उपस्थित होते. आगीचे नेमके कारण शोधून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.























































