

पवनार : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे नगर परिसरात अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते शेखर लोखंडे यांनी रांगोळीच्या माध्यमातून बाबासाहेबांची हुबेहूब प्रतिमा साकारत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
या रांगोळीतील बारकावे, रंगसंगती आणि वास्तवदर्शी सादरीकरणामुळे परिसरात येणाऱ्या नागरिकांनी या कलाकृतीचे मनापासून कौतुक केले. जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शेखर लोखंडे यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून बाबासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त केली असून, अशा उपक्रमांतून समाजात जागरूकता आणि प्रेरणा निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनीही या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत बाबासाहेबांना अभिवादन केले.
























































