वर्धा : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज सावंगी मेघे ग्रामपंचायत परिसराला भेट देऊन नागरिकांच्या विविध समस्या व अडचणी जाणून घेतल्या. समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, तहसीलदार संदीप पुंडेकर, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, माजी सरपंच विलास दोड, माजी उपसरपंच सविता दोड आदी उपस्थित होते.

मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी सावंगी मेघे येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानाची पाहणी करून आवश्यक सोयी-सुविधा निर्माण करण्याबाबत गटविकास अधिकारी व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण अधिकाऱ्यांनी संयुक्त नियोजन करावे, अशा सूचना डॉ. भोयर यांनी दिल्या. तसेच गावातील अतिक्रमित जागांबाबत पात्र नागरिकांना पट्टे देण्यासाठी तहसीलदारांनी कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. सावंगी ग्रामपंचायत इमारतीच्या नूतनीकरणासाठी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून सुरू असलेल्या कामांची त्यांनी पाहणी केली. उर्वरित कामे तात्काळ पूर्ण करून 1 मे रोजी ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण करावे, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच उपआरोग्य केंद्र अत्याधुनिक करण्याच्या सूचनाही पालकमंत्री डॉ. भोयर यांनी यावेळी केल्या.

माजी खासदार स्व. दत्ता मेघे यांच्या समाजकार्याच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) निधीतून भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती डॉ. भोयर यांनी दिली. स्मारकासाठी जागेची पाहणी सुरू असून जागा उपलब्ध झाल्यानंतर त्या परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा, अभ्यासिका, मुलांसाठी खेळाच्या सोयी व उद्यान विकसित करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. नागरिकांनी जमिनीचे पट्टे, पिण्याच्या पाण्याची समस्या, अंगणवाडी इमारत बांधकाम, मुलांसाठी खेळाचे मैदान उपलब्ध करून देणे, तसेच सावंगी येथील स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण आदी मागण्यांचे निवेदन पालकमंत्र्यांना सादर केले. या भेटीदरम्यान सावंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!