
वर्धा : राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर सातत्याने घडणाऱ्या भीषण अपघातांमागे वेग किंवा चालकांची चूक एवढीच कारणे नसून, महामार्गावरच बेवारसपणे उभी असलेली नादुरुस्त ट्रक, ट्रेलर व अन्य जडवाहने ही मोठी आणि गंभीर समस्या बनली आहे. वाहन बिघडल्यावर ते हलविण्याऐवजी चालकांकडून थेट महामार्गावरच उभे केले जाते. मात्र त्या वाहनामागे नादुरुस्ती असल्याचे दर्शवणारे कोणतेही चेतावणी फलक, रिफ्लेक्टर, ब्लिंकर किंवा लाल दिवे लावले जात नाहीत. परिणामी भरधाव वेगात येणारी वाहने अचानक समोर आलेल्या जड वाहनावर थेट धडकतात आणि काही क्षणांतच प्रवाशांचे आयुष्य उद्ध्वस्त होते.
विशेषतः रात्रीच्या वेळी, पहाटेच्या सुमारास, धुके किंवा पावसामुळे दृश्यता कमी असताना असे उभे ट्रक-ट्रेलर मृत्यूचे सापळे ठरत आहेत. महामार्गावर प्रवास करणाऱ्या कार, जीप, दुचाकी व हलक्या वाहनांना या नादुरुस्त वाहनांचा अंदाज येत नाही. वेग जास्त असल्याने ब्रेक मारण्यास किंवा वाहन वळवण्यास वेळ न मिळाल्यामुळे लहान वाहने थेट ट्रकखाली शिरतात. अनेक अपघातांत चालकासह संपूर्ण कुटुंबाचा जागीच मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या असून, अनेक वेळा मृतदेह ओळखू न येण्याइतपत चिरडले जातात. अनेक अपघातांच्या चौकशीत एकच बाब सातत्याने समोर येत आहे—अपघातस्थळी उभ्या असलेल्या नादुरुस्त जडवाहनामागे कोणताही संकेत फलक किंवा सुरक्षा व्यवस्था नव्हती. तरीही अशा वाहनचालकांवर किंवा मालकांवर कठोर कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. अपघात घडल्यानंतर पंचनामा, उत्तरीय तपासणी व गुन्हा नोंदविण्यापुरतीच कार्यवाही होते; मात्र भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी कोणतीही ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविली जात नाही.
मोटार वाहन कायद्यानुसार नादुरुस्त वाहन रस्त्यावर उभे करताना ठरावीक अंतरावर त्रिकोणी रिफ्लेक्टर, चेतावणी फलक, हॅझार्ड लाईट व रिफ्लेक्टिव्ह टेप लावणे बंधनकारक आहे. तसेच वाहन शक्य तितक्या लवकर रस्त्याच्या कडेला किंवा सुरक्षित ठिकाणी हलविणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात हे नियम केवळ कागदावरच मर्यादित राहिले असून, महामार्ग पोलीस, आरटीओ आणि संबंधित यंत्रणांची प्रभावी देखरेख नसल्याचे स्पष्ट दिसून येते. या निष्काळजीपणाची किंमत निष्पाप नागरिकांना आपल्या प्राणांनी मोजावी लागत आहे. एका क्षणाच्या अपघातात घरचा कर्ता पुरुष, आई-वडील किंवा लहान मुले गमावल्याने अनेक कुटुंबे कायमची उद्ध्वस्त होत आहेत. आर्थिक कणा मोडलेली कुटुंबे आयुष्यभर या जखमा घेऊन जगत आहेत. मात्र या घटनांकडे प्रशासनाकडून केवळ ‘अपघात’ म्हणून पाहिले जात असल्याने दोषींची जबाबदारी निश्चित होत नाही, ही बाब अधिक गंभीर ठरत आहे.
महामार्गांवर सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नादुरुस्त जडवाहने ही चालती-फिरती मृत्यूची सापळे असून, संकेत फलक न लावणे हा थेट गुन्हेगारी निष्काळजीपणा मानून संबंधित वाहनचालक व मालकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. महामार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी नादुरुस्त वाहनांची तत्काळ जप्ती, मोठा दंड, रात्रीच्या वेळी विशेष तपासणी मोहिमा, महामार्ग पोलीस व आरटीओची संयुक्त गस्त आणि अपघातप्रवण ठिकाणी प्रकाशयोजना व चेतावणी फलक उभारणे या उपाययोजना तातडीने राबविल्या नाहीत, तर महामार्ग हे प्रवासाचे मार्ग न राहता मृत्यूचे मार्ग बनत जातील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
महामार्गावर नादुरुस्त झालेल्या अनेक जडवाहनांमध्ये कोणत्याही प्रकारची मूलभूत सुरक्षा सुविधा उपलब्ध नसल्याचेही गंभीर वास्तव समोर येत आहे. अनेक ट्रक व ट्रेलरमध्ये चेतावणी फलक, रिफ्लेक्टर, हॅझार्ड लाईट किंवा प्राथमिक सुरक्षा साधने नसल्यामुळे वाहन बिघडल्यावर चालकांकडून तात्पुरते आणि धोकादायक उपाय अवलंबले जातात. काही ठिकाणी रस्त्यावर दगड आडवे ठेवले जातात, तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या किंवा पाने तोडून रस्त्यावर टाकली जात असल्याचे चित्र दिसून येते. मात्र अशा अपुऱ्या व अयोग्य संकेतांमुळे उलट अपघाताचा धोका वाढत असून, या प्रकाराकडे संबंधित यंत्रणांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.




























































