
मोहन सरकार
सिंदी (रेल्वे) : नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर सिंदी रेल्वे नगरपालिकेत सत्ताधारी व विरोधी गटांची अधिकृत बांधणी पूर्ण झाली असून आता उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदांच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंगळवारी (ता. १३) होणाऱ्या या निवडींमुळे पालिकेतील सत्तासमीकरण स्पष्ट होणार आहे.
२० सदस्य संख्या असलेल्या सिंदी रेल्वे नगरपालिकेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी प्रथमच निवडून आलेले नगरसेवक प्रविण मडावी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गट व काँग्रेस यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या ‘सिंदी शहर विकास गट’च्या गटनेतेपदी काँग्रेसचे प्रथमच नगरसेवक बनलेले अजय कलोडे यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दोन्ही गटांचे गटनेते पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.
सत्ताधारी भाजपाचे नगराध्यक्षा यांच्यासह दहा नगरसेवक निवडून आले असून, भाजपचे माजी नगरसेवक अमोल बोंगाडे यांच्या पत्नी व विद्यमान अपक्ष नगरसेविका ममता बोंगाडे यांनी भाजप गटात प्रवेश केल्याने सत्ताधारी गटाची संख्या ११ अधिक नगराध्यक्षा अशी झाली आहे. त्यामुळे भाजपला पालिकेत स्पष्ट बहुमत प्राप्त झाले आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाचे पाच व काँग्रेसचे चार असे एकूण नऊ नगरसेवक मिळून ‘सिंदी शहर विकास गट’ची स्थापना करण्यात आली आहे. सक्षम विरोधकाची भूमिका बजावत पालिकेच्या कारभारावर लक्ष ठेवण्याचा निर्धार या गटाने व्यक्त केला आहे. दोन्ही गट सक्रिय असल्याने येत्या काळात पालिकेचा कारभार अधिक पारदर्शक राहील, अशी चर्चा शहरात आहे.
दरम्यान, उपाध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजप गटात सलग चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले सुधाकर वलके आणि दुसऱ्यांदा नगरसेवक बनलेले अकील शेख यांच्यात खरी चुरस सुरू असल्याची विश्वसनीय माहिती आहे. याशिवाय पाच वर्षांच्या कार्यकाळात चार नगरसेवकांना सव्वा-सव्वा वर्ष उपाध्यक्षपद देण्याचा ‘फॉर्म्युला’ ठरण्याचीही दाट शक्यता वर्तविली जात आहे.
स्वीकृत नगरसेवक पदासाठी सत्ताधारी गटाकडून अजया साखळे, ओमप्रकाश राठी, प्रविण सिर्सीकर, इम्रान सुफी आदींची नावे चर्चेत असून सौ. अजया साखळे व ओमप्रकाश राठी यांच्यात चढाओढ असल्याचे बोलले जात आहे. याबाबत अंतिम निर्णय पक्षाचे नेते तथा आमदार समीर कुणावार घेणार असल्याची माहिती आहे.
विरोधी गटाकडून राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाचे शहराध्यक्ष गंगाधर कलोडे हे स्वीकृत नगरसेवक पदासाठी एकमेव नाव पुढे आले असून, यावर अंतिम निर्णय पक्षाचे नेते अतुल वांदीले घेणार असल्याचे कळते. त्यामुळे उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदांची ‘लॉटरी’ अखेर कोणाच्या नावावर लागते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

























































