Home ◼️ संपादकीय गरिबीवर मात करत अजिंक्य नेवारेचे यश! जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत चतुर्थ क्रमांक ;...

गरिबीवर मात करत अजिंक्य नेवारेचे यश! जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत चतुर्थ क्रमांक ; वार्डात जल्लोषात स्वागत

वर्धा : अत्यंत गरीब परिस्थितीत वाढ होत असतानाही कोणत्याही वाईट व्यसनाच्या आहारी न जाता, कठोर मेहनत आणि शिस्तीच्या जोरावर यश संपादन करणाऱ्या स्टेशन फेल येथील अजिंक्य सुरेश नेवारे याने वर्धा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. ‘आमदार श्री २०२५’ अंतर्गत आयोजित वर्धा जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत ६० ते ६५ किलो वजन गटात त्याने चतुर्थ क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली.

या यशाबद्दल वार्डातील नागरिकांनी अजिंक्य नेवारे याचे मनःपूर्वक स्वागत केले. यावेळी उपस्थितांनी त्याच्या संघर्षमय प्रवासाचे कौतुक करत, अडचणींवर मात करत पुढे जाण्याची जिद्द तरुणांसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दांत गौरव केला. तसेच, कोणत्याही परिस्थितीत न थांबता असेच पुढे जावे आणि भविष्यात आणखी मोठे यश मिळवावे, असे आवाहनही करण्यात आले. अजिंक्य नेवारे याने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांच्या कष्टांना आणि स्वतःच्या मेहनतीला दिले. कठीण परिस्थितीतही सकारात्मक मार्ग निवडल्यास यश नक्की मिळते, असा विश्वास त्याने व्यक्त केला. आपल्या कुटुंबाला आधार देत, वार्डाचे नाव उंचावण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचेही तो म्हणाला. स्वागतप्रसंगी युवा नेते शेहबाज (गोलू) शेख, माजी नगरसेवक शेखर आगरकर, भीम आर्मी वर्धा जिल्हाध्यक्ष आशिष सोनटक्के, बंटी रंगारी, साहिल शेख यांच्यासह वार्डातील अनेक नागरिक उपस्थित होते. अजिंक्य नेवारेच्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्याची वाटचाल अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!