
वर्धा : आदर्श आचारसंहितेच्या काळात शांतता भंग होऊ नये आणि आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका निर्विघ्न पार पडाव्यात, यासाठी सेवाग्राम पोलिसांनी रविवारी सकाळी मौजा बरबडी व मांडवगड शेतशिवारात वॉश आउट मोहीम राबवून अवैध दारू व्यवसायावर मोठी कारवाई केली. ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने शेतशिवारातील झुडपी भागात व जमिनीत लपवून ठेवलेले लोखंडी व प्लास्टिक ड्रम, गावठी मोहा दारू तयार करण्यासाठी वापरला जाणारा कच्चा सडवा रसायन, उकळलेला सडवा, भट्टीसाठी लागणारे साहित्य असा एकूण ₹९.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. सर्व सामग्री पंचासमक्ष नष्ट करण्यात आली.
या कारवाईदरम्यान प्रेम भोसले (रा. पुजई), सुधाकर चिंतामण लेंडे (रा. बरबडी), कवडू बापूनाथ वरकडे (रा. सेवाग्राम) आणि राहुल धर्मपाल दापे (रा. सेवाग्राम) या चार जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही मोहीम उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत ठाणेदार सदाशिव ढाकणे, पो.उपनि. निलेश वाडीवा, वाल्मीक बांबर्डे, हवा. हरीदास काकड, जयेश डांगे, विशाल ढेकले, ना. स्वप्निल मोरे, धिरज मिसाळ आणि शि. चंद्रकांत कोहचाडे यांनी सहभाग घेतला.






















































