

वर्धा : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत यशवंत महाविद्यालय वर्धा आणि विविध सामाजिक व क्रीडा संस्थांच्या संयुक्त विद्यमाने वर्धा शहरात पर्यावरण जनजागृतीसाठी भव्य रॅली, मॅरेथॉन, स्केटिंग स्पर्धा आणि चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. ‘पर्यावरण वाचवा – भविष्य सुरक्षित करा!’ या प्रेरणादायी घोषवाक्याखाली झालेल्या या उपक्रमात शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
रॅलीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून झाली. तेथून यशवंत महाविद्यालयापर्यंत निघालेल्या रॅलीमध्ये लायन्स क्लब गांधी सिटी, कलास्पर्श फाऊंडेशन, जिम्नॅस्टिक फिटनेस असोसिएशन, रोलर अॅथलेटिक्स असोसिएशन, हौशी हँडबॉल असोसिएशन, बास्केटबॉल असोसिएशन आदी संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कलास्पर्श फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनात विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणावरील संदेशपर चित्रे सादर केली. पर्यावरणविषयक चिंतनातून साकार झालेल्या या कलाकृतींनी प्रदर्शनाला आलेल्या नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
या उपक्रमाचे अध्यक्षस्थान यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश ठाकरे यांनी भूषवले. यावेळी लायन्स क्लब गांधी सिटीचे डायरेक्टर संदीप चिचाटे, अध्यक्ष आशिष पोहाणे, उपाध्यक्ष सुरेशकुमार बरे, डॉ. किशोर पोफळी (छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार विजेते), कॅप्टन राहुल भालेकर, नितीन जाधव (सचिव, जिम्नॅस्टिक फिटनेस असोसिएशन), जुबेर खान (सचिव, रोलर अॅथलेटिक्स असोसिएशन), संदीप कांबळे, प्रदीप सेलूकर व धीरज गिरी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले, तसेच वृक्षारोपणही करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात कीमया पोहाणे, सागर बाळसराफ, आराध्या चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले. पर्यावरण रक्षणाच्या दिशेने समाजात जागरूकता निर्माण करणारा हा उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवण्याची गरज सहभागी संस्थांनी व्यक्त केली.