

वर्धा : महिलेला पैशाकरिता पती व तिचा मुलगा सतत त्रास द्यायचा. यातूनच पती व मुलाने तिला जाळून ठार केल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश मोनिका आरलैड यांनी आरोपी बापलेकास आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. भीमराव गोडघाटे व अमिर भीमराव जोडघाटे (दोघेही रा. खैरी-कामठी) असे आरोपीचे नाव आहे.
८ नोव्हेबर २०१५ रोजी या बापलेकांनी संगनमत करून मृत माया भीमराव गोडघाटे हिच्याशी राहत्या घरी पैशाच्या कारणावरून वाद घालत मारहाण केली. दोरीने दोन्ही हातपाय बांधून तिच्या तोंडात कपडा कोंबला. त्यावर कापड बांधून तिला उचलून घराच्या बाजूला असलेल्या प्रशांत खेडकर यांच्या शेतात नेऊन अंगावर खाद्यतेल टाकून पेटवून दिले. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याकरिता पतीने खरांगणा पोलिसांत खोटी तक्रार दिली. मृताचा भाऊ निरंजन डांगरे यांच्या तक्रारीवरून खरांगणा पोलिसांनी पुरावे गोळा करून बापलेकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पांडे यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश मोनिका आरलैड यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून बापलेकांना आजन्म कारावास व २५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावासासह इतरही शिक्षा सुनावली. शासनाच्यावतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता रत्ना आर, घाटे यांनी बाजू मांडली. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून किशोर अप्तुरकर यांनी सहकार्य केले. त्यांनी साक्षिदारांना न्यायालयात हजर करण्याचे महत्वापूर्ण काम केले.