

वर्धा : अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ व्ही, टी. सूर्यवंशी यांनी आरोपी नरेंद्र अंबादास वसू, रा. बँक ऑफ इंडिया कॉलनी वर्धा याला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ११ (आय) व १२ नुसार दोन वर्षांचा सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड तसेच दंड न अरल्यास सहा महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
प्राप्त माहितीनुसार, 9 ऑगस्ट २०१८ ला पीडिता ही सकाळी ११ वाजताच्या सुमारास तिची शिकवणी संपल्यावर सायकलने घराकडे जात असताना आरोपी नरेंद्र अंबादास वसू याने पीडिताला वाटेत अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु, पीडिता ही थांबली नाही. त्यानंतर आरोपीने त्याच्याजवळ असलेल्या दुचाकीने पीडिताच्या जवळ येत तिला दुचाकीवर बसण्याचा आग्रह केला. मात्र, पीडितेने मी तुला ओळखत नसल्याचे सांगत दुचाकीवर बसण्यास नकार दिला. तसेच तिच्या घराच्या दिशेने जाण्यास निघाली.
आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने पुन्हा पीडितेचा पाठलाग करून तिच्याशी असभ्य वर्तन केले, घाबरलेल्या पीडितेने घरी परतल्यावर संपूर्ण प्रकाराची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर या प्रकरणी वर्धा शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली. तपासाअंती पोलीस उपनिरीक्षक चेतन बोरखडे यांनी प्रकरण न्यायप्रविष्ट केले. या प्रकरणात तीन साक्षीदारांची साक्ष न्यायालयात तपासण्यात आली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद आणि पुराव्यांच्या आधारे न्या. व्ही. टी. सूर्ववंशी यांनी आरोपीला शिक्षा ठोठावली. शासकीय बाजू अँड. विनय आर. घुडे यांनी मांडली. तर पैरवी अधिकारी म्हणून देवेंद्र कडू, सुजित पांडव यांनी काम पाहिले.