Home ◼️ संपादकीय समृद्धी महामार्गाजवळ भीषण अपघात ; दोन दुचाकींच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

समृद्धी महामार्गाजवळ भीषण अपघात ; दोन दुचाकींच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

वर्धा : देवळी-पुलगाव मार्गावरील समृद्धी महामार्गाच्या टोल प्लाझाकडे जाणाऱ्या पुलाखाली दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी सुमारे १.३० वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

मृतांमध्ये सालफळ येथील ग्रामपंचायत कर्मचारी योगेश रामकृष्ण मेश्राम तसेच टाकळी (दरणे) येथील देवेंद्र त्र्यंबक दरणे व गंगाधर पंढरीनाथ दरणे यांचा समावेश आहे. चौपदरी रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक कशी झाली, याबाबत परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, योगेश मेश्राम हे देवळी येथे परीक्षा देऊन एमएच-४० बीयू-२२७४ क्रमांकाच्या दुचाकीने आपल्या सालफळ गावाकडे परतत होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या एमएच-३२ एव्ही-८४५५ क्रमांकाच्या दुचाकीशी त्यांची जोरदार धडक झाली.

दुसऱ्या दुचाकीवरील देवेंद्र दरणे आणि गंगाधर दरणे हे काका-पुतणे असून ते रोहणा येथे नातेवाईकांना लग्नपत्रिका देऊन गावाकडे परतत होते. मात्र नियतीने घात केला आणि तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच पुलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पुलगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. या दुर्घटनेमुळे सालफळ आणि टाकळी (दरणे) गावांवर शोककळा पसरली असून पुढील तपास पुलगाव पोलिस करीत आहेत.

लग्नपत्रिका वाटून परतताना काळाचा घाला

देवेंद्र दरणे आणि गंगाधर दरणे हे आपल्या नातेवाईकांच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी रोहणा येथे गेले होते. तेथून परत येत असतानाच हा भीषण अपघात झाला. तर योगेश मेश्राम हे परीक्षा देऊन घरी परतत होते. एका क्षणात तिघांच्याही आयुष्याचा अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!