Home ◼️ संपादकीय वर्ध्यात पुन्हा बहरणार गावरानी आंबे ; संवर्धन मोहिमेला सुरुवात ! वन विभाग...

वर्ध्यात पुन्हा बहरणार गावरानी आंबे ; संवर्धन मोहिमेला सुरुवात ! वन विभाग आणि निसर्गप्रेमींचा अभिनव उपक्रम

वर्धा : जिल्ह्यात नामशेष होत चाललेल्या गावरानी आंब्यांच्या संवर्धनासाठी एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अरण्यऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचे सहकारी कौशल मिश्र, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी बी. एस. मिरगे आणि ॲड. ताम्रध्वज बोरकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत असून वन विभागाचेही मोलाचे सहकार्य लाभत आहे.

पूर्वी वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर देशी आंब्यांच्या आमराया होत्या. मात्र कालांतराने झाडतोड आणि इतर कारणांमुळे या झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली. या पार्श्वभूमीवर उरलेल्या गावरानी आंब्यांच्या गुठळ्या संकलित करून त्यापासून रोपे तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्ह्याचे उपवनसंरक्षक हरवीर सिंह, सहायक वनसंरक्षक एम. आडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गावांमधून गुठळ्या संकलित करण्यात आल्या. कारंजा येथील माजी वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र सावंत, वनरक्षक अक्षय जाधव तसेच पांजरा बंगला रेंजचे शिवाजी सावंत यांनी या मोहिमेत विशेष योगदान दिले.

पांजरा बंगला येथे गुठळ्या हस्तांतरण कार्यक्रम पार पडला. यावेळी बी. एस. मिरगे, एम. आडे, वाघ, निलीमा मुणोत, ॲड. ताम्रध्वज बोरकर, पांजरा बंगला गावचे सरपंच शेषराव आडे यांच्यासह वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

येत्या पावसाळ्यात सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेत या गुठळ्यांची लागवड करण्यात येणार असून त्यापासून तयार होणारी रोपे विविध ठिकाणी लावण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे देशी आंब्यांच्या संवर्धनाचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ज्यांच्याकडे गावरानी आंब्यांच्या गुठळ्या आहेत त्यांनी त्या कौशल मिश्र, शिवाजी चौक, वर्धा येथे जमा करून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.बॉक्स

देशी आंब्यांच्या आमराया पुन्हा फुलविण्याचा संकल्प

गावरानी आंब्यांच्या गुठळ्यांपासून रोपे तयार करून वर्धा जिल्ह्यात पुन्हा देशी आंब्यांच्या आमराया फुलविण्याचा संकल्प या उपक्रमातून करण्यात आला आहे. वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग आणि निसर्गप्रेमींच्या सहभागातून ही संवर्धन मोहीम राबविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!