
वर्धा : घरगुती वाद विकोपाला जावून मुलाने काठीने डोक्यावर जबर प्रहार करीत बापाची हत्या केली. ही घटना नजीकच्या पवनी येथे घडली. सुरेश गवळी (५२) असे मृताचे नाव आहे.
सुरेश गवळी व त्याचे कुटुंबीय मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करतात. काही दिवसांपूर्वी सुरेश याचा अपघात झाला. तेव्हा पासुन तो घरीच राहत होता. रोजमजुरीचे काम करून सुरेशची पत्नी कुटुंबाचे पालन-पोषण करते. काही वर्षांपूर्वी सुरेशच्या मूलीचे लग्न झाले. मुलीच्या लग्नानंतर सुरेश, सुरेशची पत्नी व मुलगा आदीत्य तिघे एकाच घरात रहायचे. अशातच रविवारी दुपारी कौटुंबिक कारणावरून आदित्य आणि सुरेश यांच्यात वाद झाला. याच वादादरम्यान आदित्य याने जवळ असलेल्या काठीने सुरेशच्या डोक्यावर जबर प्रहार केला. यात सुरेश याचा जागीच मृत्यू झाला.
विशेष म्हणजे आदित्य याला दारूचे व्यसन लागले होते. अशातच दारूच्या कारणावरून आदित्य आणि त्याच्या कुटुंबियांत नेहमी खटके उडत होते. या प्रकरणी अल्लीपूर पोलीस ठाण्यात मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून आदीत्य गवळी (२१) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. मिश्रा, स्वप्नील भोजगुडे करीत आहेत.

















































