

सेलू : जंगलातील नैसर्गिक पाणवठे कोरडे पडल्याने सध्या वन्यप्राणी शेतशिवाराकडे धाव घेत आहे. असाच काहीसा प्रकार होत शेतशिवारात प्रवेश केलेल्या बिबट्याने गोठ्यात बांधून असलेल्या जनावरांवर हल्ला करून दोन वासरांना ठार केले. यामुळे चिंचोळी शिवारात बिबट्याबाबत दहशतीचे वातावरण पसरले आहे.
घोराड येथील शेतकरी पांडुरंग मनोहर सुरकार यांचे चिंचोली शिवारात शेत आहे. त्यांनी शेतातील जोठ्यात जनावरे बांधली होती.परिसरात कुणी नसताना बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून गोठ्यातील दोन वासरांना ठार केले. ही बाब बुधवारी सकाळी लक्षात येताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. या घटनेची वनविभागाने नोंद घेतली असून, शेतकरी सुरकार यांचे १५ हजाराचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या एन. के. पाचंपोर व वनरक्षक प्रतीक तेलंग यांनी पंचनामा केला. या भागातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे. सेलू तालुक्यात बोर हा व्याघ्र प्रकल्प असून या परिसरात प्रकल्पा लगतच्या अनेक गांवात वन्य प्राण्यांचा मोठा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. व्याघ्र प्रकल्पालगत शेती असलेल्या शेतकऱ्यांना शेती करणेही सध्या कठीण झाले आहे. या पूर्वी या भागातील शेतकऱ्यांनी वन्यप्राण्यांपासून बचावासाठी शेतीला कुंपन घाळून देण्याची मागणी केली होती.