
वर्धा : शहरासह लगतच्या भागात सध्या ५० हून अधिक लहान-मोठी हॉटेल्स आणि ढाबे सुरू आहेत. मात्र, यातील बहुतांश हॉटेल्सच्या स्वयंपाकगृहात भयानक अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. हॉटेल चालकांकडून ग्राहकांच्या जिवाशी उघडपणे खेळ सुरू असून, अन्न व औषध प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
शहरातील वरकरणी सुसज्ज असलेल्या अनेक नामांकित आणि छोट्या हॉटेल्सच्या किचनमध्ये घाणीचे साम्राज्य आहे. ज्या ठिकाणी अन्न शिजवले जाते, तेथेच झुरळे (कॉकरोच) आणि इतर कीटकांचा वावर पाहायला मिळतो. उघड्यावर अन्न ठेवणे, कुजलेल्या भाज्यांचा वापर करणे आणि दूषित पाण्याचा वापर करणे यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागपूर मार्गावरील एका हॉटेलमध्ये खाद्यपदार्थात कीटक आढळल्याचा प्रकार नुकताच उजेडात आला. मात्र, कुठलीही कारवाई झाली नाही.
धक्कादायक बाब म्हणजे, अनेक हॉटेल्समध्ये काम करणारे ‘कुक’ आणि कर्मचारी स्वतः आजारी असतात. त्यांच्या वैद्यकीय तपासणीची कोणतीही प्रमाणपत्रे हॉटेल मालकांकडे नसतात. अशा आजारी कर्मचाऱ्यांमार्फत अन्न शिजवले आणि वाढले जात असल्याने ग्राहकांना संसर्गजन्य आजार होण्याचा धोका प्रचंड वाढला आहे.
नियमानुसार हॉटेल्सची नियमित तपासणी करणे अन्न व औषध प्रशासनाचे काम आहे. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस किंवा नियमित तपासणी केली जात नाही. केवळ एखादी दुर्घटना घडली किंवा तक्रार आली की, जुजबी कारवाई करून प्रशासन हात झटकून घेते, असा आरोप आता होऊ लागला आहे.
‘गोरस भंडार’वरील कारवाईमुळे संताप
शहरात शुद्धतेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या ‘गोरस भंडार’ वर नुकतीच प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. जर एवढ्या मोठ्या आणि नामांकित ब्रँडवर कारवाई होऊ शकते, तर मग इतर अस्वच्छ हॉटेल्स आणि ढाब्यांवर प्रशासन मेहेरबान का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.



























































