Home ◼️ संपादकीय पाण्याच्या प्रत्येक थेंबातून वाहणार स्मृतींचा ओलावा! सेवाभावाची अनोखी श्रद्धांजली; भक्तांसाठी आरओ वॉटर...

पाण्याच्या प्रत्येक थेंबातून वाहणार स्मृतींचा ओलावा! सेवाभावाची अनोखी श्रद्धांजली; भक्तांसाठी आरओ वॉटर कुलरची भेट

वर्धा : एखादी व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेली तरी तिचे विचार, संस्कार आणि समाजासाठी केलेले कार्य लोकांच्या स्मरणात कायम जिवंत राहते. अशाच एका सेवाभावी व्यक्तिमत्त्वाच्या स्मृतींना समाजोपयोगी कार्याच्या माध्यमातून जपण्याचा प्रेरणादायी उपक्रम आजनसरा येथे राबविण्यात आला.

स्व. निळकंठराव भारती यांच्या पावन स्मृतीप्रित्यर्थ श्रीमती सुमनबाई मधुसुदनराव गिरी यांच्या वतीने संत भोजाजी महाराज देवस्थान येथे सुमारे ६७ हजार रुपये किमतीचा ८० लिटर क्षमतेचा आरओ वॉटर कुलर भेट देण्यात आला. भक्तांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली ही सुविधा दिवंगत व्यक्तिमत्त्वाला वाहिलेली एक अर्थपूर्ण श्रद्धांजली ठरली.

परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत भोजाजी महाराज देवस्थानात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम, उत्सव आणि दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याची आवश्यकता अधिक जाणवते. ही गरज लक्षात घेऊन गिरी कुटुंबाने आरओ वॉटर कुलरची भेट देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता देवस्थानात येणाऱ्या भाविकांना स्वच्छ, शुद्ध आणि थंड पिण्याचे पाणी सहज उपलब्ध होणार आहे.

स्व. निळकंठराव भारती हे समाजाभिमुख विचारांचे, सेवाभावी वृत्तीचे आणि सर्वांना आपलेसे करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी केवळ औपचारिक कार्यक्रम न करता समाजाच्या उपयोगी पडणारे कार्य करण्याचा निर्णय गिरी कुटुंबाने घेतला. त्यामुळे हा उपक्रम श्रद्धांजलीसोबतच समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे.

देवस्थान परिसरात आयोजित कार्यक्रमात श्रीमती सुमनबाई गिरी यांच्या हस्ते विधिवत पूजन करून फित कापून आरओ वॉटर कुलरचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपस्थित भाविक, ग्रामस्थ आणि देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. फुले वाहून श्रद्धांजली अर्पण करण्यापेक्षा समाजोपयोगी कार्यातून स्मृती जपल्या गेल्या तर तीच खरी श्रद्धांजली ठरते, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. यावेळी डॉ. संदीप लोंढे, माजी सरपंच मारोतराव राजूरकर, अविनाश गिरी, संजय गिरी, प्रशांत गिरी, त्र्यंबक तळवेकर यांच्यासह गावातील अनेक मान्यवर व भाविक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!