Home ◼️ संपादकीय हिंगणघाटात एमडी ड्रग्स तस्करांवर एलसीबीचा धडक छापा ; 54 ग्रॅम मेफेड्रॉन, रोख...

हिंगणघाटात एमडी ड्रग्स तस्करांवर एलसीबीचा धडक छापा ; 54 ग्रॅम मेफेड्रॉन, रोख रक्कम, मोबाईल व दुचाकीसह 4.71 लाखांचा मुद्देमाल जप्त; पाच आरोपींविरुद्ध गुन्हा

वर्धा : जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) हिंगणघाट येथे मोठी कारवाई करत मेफेड्रॉन (एमडी ड्रग्स) तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत 54 ग्रॅम 05 मिलीग्रॅम मेफेड्रॉन, रोख रक्कम, सहा मोबाईल आणि दुचाकीसह एकूण 4 लाख 71 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या विक्री व तस्करीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत 30 मे रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हिंगणघाट शहरातील माऊली पार्क, संत तुकडोजी वार्ड परिसरात छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान निखील मनोजराव रामनवार (वय 25), पियुष राजू मुसळे (वय 27), जय वसंतराव चुटे (वय 21) आणि कार्तिक वसंतराव हमंद (वय 29) हे संशयास्पदरीत्या आढळून आले. पोलिसांनी चौघांची झडती घेतली असता त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मेफेड्रॉन (एमडी) अंमली पदार्थ, विक्रीतून मिळालेली रोख रक्कम, मोबाईल फोन आणि टीव्हीएस ज्युपिटर मोपेड जप्त करण्यात आली.

तपासादरम्यान जप्त करण्यात आलेला मेफेड्रॉनचा साठा हा चौघांच्याही मालकीचा असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्यांनी हा अंमली पदार्थ नागपूर येथील पंकज साठोणे याच्याकडून खरेदी केल्याची माहिती समोर आली. त्यामुळे त्यालाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आरोपी पियुष मुसळे याच्यावर जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली असताना तो मनाई क्षेत्रात आढळून आला. त्यामुळे त्याच्यावर हद्दपारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणीही कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणी सर्व पाच आरोपींविरुद्ध हिंगणघाट पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!