
समुद्रपूर : येथील आठ महिला शेतमजूर धुमनखेडा येथे शेतातील फणे व केरकचरा साफ करण्यासाठी गेले होते. त्यांना परत घेऊन येणारे वाहन (क्र.एमएच 3२ / क्यू ०५९५) अचानक पलटले. यात एक महिला गंभीर जखमी झाली. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली समुद्रपूरजवळील स्मशानभूमीजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहनाने दोन पलट्या मारल्या.
वाहनातील शेतमजूर विमल पुंडलिक गिरोले (वय ५०), आम्रपाली दिलीप बडवाईक (४०), अपर्णा रवींद्र उनपाने (४०), प्रीती विलास मेश्राम (४०), सोनाबाई किशोर गजभिये (६3), कल्पना शुभाष मेश्राम (४०), मीना गजू टेंभरे (४०), विमल कुंडलिक गिरोले (५५) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना प्राथमिक उपचाराकरिता येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यापैकी प्रीती विलास मेश्राम गंभीर जखमी आहे. त्यांना सेवाग्राम येथील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. समुद्रपूर पोलिस पुढील तपास करीत आहेत.



























































