
पवनार : येथील बाजार चौक परिसरात शनिवारी सकाळी अचानक लागलेल्या आगीमुळे एकच खळबळ उडाली. सदर शाळेच्या खुल्या जागेत अनेक दिवसापासून पडून असलेला राजू लाडे यांचा पानठेला या आगीत पूर्णपणे जळून खाक झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी संबंधितांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास पानठेल्याच्या परिसरातून धूर निघताना दिसताच नागरिकांनी धाव घेतली. काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले आणि ठेल्यावर ठेवलेले साहित्य, फर्निचर व इतर वस्तू ज्वाळांच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. आग वाढत असल्याचे पाहून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत पाण्याच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. उघडी ज्वाला किंवा इतर कारणांबाबत चर्चा होत असली, तरी अधिकृत कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेत पानठेल्यातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने संबंधिताचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सतर्क नागरिकांमुळे मोठा अनर्थ टळला वेळीच आग लक्षात आल्याने आणि नागरिकांनी तत्काळ मदतकार्य केल्यामुळे आग पसरू शकली नाही. त्यामुळे जवळील इतर दुकाने व वस्तूंना संभाव्य धोका तळला.


























































