Home जिल्हा वर्धा पवनूरात ३०७ वर्षांच्या ‘गळाच्या रथयात्रेला’ उसळली गर्दी ! “जय हो पाताळ माता”च्या...

पवनूरात ३०७ वर्षांच्या ‘गळाच्या रथयात्रेला’ उसळली गर्दी ! “जय हो पाताळ माता”च्या जयघोषाने गाव दुमदुमले ; परंपरेचा अनोखा सोहळा

पवनूर : विदर्भातील एकमेव आणि ऐतिहासिक ठरलेल्या गळाच्या रथयात्रेचा सोहळा पवनूर येथे मंगळवारी (ता. ७) उत्साहात पार पडला. तब्बल ३०७ वर्षांची परंपरा जपत आयोजित या रथयात्रेला भाविकांची मोठी गर्दी उसळली. “जय हो पाताळ माता”च्या जयघोषाने संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले.

गावाच्या मध्यवर्ती भागातून निघालेली ही रथयात्रा पाताळ माता मंदिरात जाऊन समारोप पावली. गावावर कोणतेही अरिष्ट येऊ नये, तसेच सामाजिक सलोखा अबाधित राहावा, या श्रद्धेतून ही परंपरा आजही जपली जात आहे.

या रथयात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे लाकडी जूच्या दोन्ही बाजूंना भगतांना लटकवून काढण्यात येणारी परिक्रमा. यंदा अरुण लांडे आणि मारोती दाभेकर हे सुमारे ५० फूट उंचीवर लाकडी जूला लटकून संपूर्ण गावाची परिक्रमा पूर्ण केली. त्यांच्या या धाडसी आणि श्रद्धेने ओतप्रोत सहभागामुळे उपस्थित भाविकांमध्ये विशेष आकर्षण निर्माण झाले.

गावाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या पाताळ माता मंदिरात रथयात्रेचा समारोप झाला. पाताळ माता ही गावाची ग्रामदैवत असून गावकऱ्यांची तिच्यावर निस्सीम श्रद्धा आहे. यावेळी गळाचा रथ आकर्षक सजविण्यात आला होता.

परंपरेचा अनोखा ठेवा…

३०७ वर्षांची परंपरा असलेली पवनूरची गळाची रथयात्रा विदर्भात वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. लाकडी जूला भगतांना लटकवून गावाची परिक्रमा करण्याची ही परंपरा श्रद्धा, धाडस आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक मानली जाते. ग्रामदैवत पाताळ मातेच्या कृपेने गावावर संकट येऊ नये, या भावनेतून ही रथयात्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!