Home ◼️ संपादकीय सलग तिसऱ्या वर्षी पवनार टीबीमुक्त ; सुवर्णपदक पटकावून गावाचा सन्मान ! जनजागृती,...

सलग तिसऱ्या वर्षी पवनार टीबीमुक्त ; सुवर्णपदक पटकावून गावाचा सन्मान ! जनजागृती, सर्वेक्षण आणि आरोग्य यंत्रणेच्या संयुक्त प्रयत्नांना यश

पवनार : क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने सातत्याने प्रभावी कामगिरी करत पवनार ग्रामपंचायतीने सलग तिसऱ्या वर्षी ‘टीबीमुक्त ग्रामपंचायत’ म्हणून सुवर्णपदक पटकावले आहे. जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेत आयोजित कार्यक्रमात गावाचा सन्मान करण्यात आला. पवनारमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी अक्षय इंगळे, वासुदेव राऊत (ग्रामविकास अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली क्षयरोग निर्मूलनासाठी विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या. गावात नियमित जनजागृती मोहीम, रॅली, घरभेटी आणि सर्वेक्षणाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये टीबीबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली.

गावात क्षयरोगाची लक्षणे, उपचारपद्धती, औषधोपचाराचे महत्त्व आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत माहिती देण्यात आली. संशयित रुग्णांची वेळोवेळी तपासणी करून त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. पवनारमध्ये एकूण २९५ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून त्यामधून आढळलेल्या सात रुग्णांवर सध्या औषधोपचार सुरू आहेत. या यशामध्ये आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. आरोग्य विभाग, स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळेच पवनारला हा मानाचा किताब मिळाला आहे.

मान्यवरांच्या हस्ते गौरव…

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हेमंत पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी दिघेकर तसेच डॉ. रॉबिन कांबळे यांच्या हस्ते पवनार ग्रामपंचायतीला सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल…

सलग तिसऱ्या वर्षी टीबीमुक्त राहण्याचा मान मिळवणे हे गावाच्या सातत्यपूर्ण आणि संघटित कामाचे फलित असल्याचे मान्यवरांनी यावेळी नमूद केले. आगामी काळातही हा दर्जा कायम राखत पूर्ण जिल्हा टीबीमुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!