
वर्धा : आपण ज्या पृथ्वीवर वास्तव्यास आहोत, त्या पृथ्वीला विशाल अशी सूर्यमाला लाभलेली आहे. या सूर्यमालेत तारे तुटणे, धूमकेतू, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, अमावस्या, पौर्णिमा अशा विविध आकर्षक खगोलीय घटना घडत असतात. या घटनांकडे भीतीने नव्हे, तर चिकित्सक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांनी केले.
नगर परिषदेची पीएमश्री दर्जा प्राप्त चित्तरंजनदास प्राथमिक शाळेत ‘एक्स्पर्ट टॉक’ अंतर्गत “खगोलीय ग्रह, गोल आणि तारे यांची ओळख” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्याध्यापिका मुक्ता कोठेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री तळवडेकर, पालक समिती सदस्या पूनम कुरसंगे, रविता मेश्राम तसेच अंनिसच्या सोशल मीडिया विभागाचे प्रमुख भूषण खैरकार यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरकार पुढे बोलताना म्हणाले, खगोलीय घटना लाखो वर्षांपासून घडत आहेत. त्या वेळी पृथ्वीवर मानव अस्तित्वात नव्हता. त्यामुळे ग्रहण, अमावस्या, पौर्णिमा यांचा मानवी जीवनावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. हे सर्व सावल्यांचा खेळ आहे. अंधश्रद्धांना बळी न पडता विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे.
यावेळी त्यांनी खगोलशास्त्र, ग्रह-तारे, पृथ्वीची निर्मिती, जलचर, पक्षी, वनस्पती व मानवाची उत्क्रांती याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच कोपर्निकस, ब्रुनो, गॅलिलिओ यांसारख्या शास्त्रज्ञांचे योगदानही विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. पॉवर पॉइंट सादरीकरण व अॅनिमेशन व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी विषय सोप्या आणि रंजक पद्धतीने मांडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुक्ता कोठेकर यांनी केले. सूत्रसंचालन रश्मी भोयर यांनी तर आभार प्रदर्शन भूषण खैरकार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निशा श्रीवास्तव, रंजना तांबुलकर, सुनीता धोंगडे, कु. शीतल शोक्कळवार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला शिक्षक, कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




























































