
देवळी : अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर सहकारी गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी पहाटे तीन ते साडेतीन वाजेदरम्यान यवतमाळ रोडवरील उमरे यांच्या एचपी पेट्रोलपंप समोर झाला. मोहनीश गणेश लुंगसे (२३, रा. कोल्हापूर राव) असे मृताचे तर किशोर लक्ष्मण कन्नाके (२७, रा. देवळी) असे जखमीचे नाव आहे. हे दोघेही ईसापूर येथील तडस यांच्या नायरा पेट्रोल पंपचे कर्मचारी आहे. शुक्रवारी पहाटे खर्रा खाण्यासाठी दोघेही दुचाकीने देवळीकडे निघाले होते. यादरम्यान खर्रा खातून ईसापूरकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या धडकेत डोक्याला जबर मार लागल्याने मोहनीशचा जागीच मृत्यू झाला. किशोरचे दोन्ही पाय दुखापतग्रस्त झाले आहे. त्याला सावंगी रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहे. अविनाश कन्नाके यांच्या तक्रारीवरुन देवळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून जमादार राजू कुरसंगे व मनोज कांबळे पुढील तपास करीत आहे.





























































