Home ◼️ संपादकीय स्व. अजितदादांच्या अस्थिकलशाचे धाम नदीवर विसर्जन; राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप

स्व. अजितदादांच्या अस्थिकलशाचे धाम नदीवर विसर्जन; राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप

पवनार : स्व. अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे पवनार येथील पवित्र धाम नदीवर विधिवत धार्मिक विधींनी पूजन व विसर्जन करण्यात आले. वर्धा येथून श्रद्धेने आणलेला अस्थिकलश पवनार येथे आणल्यानंतर शोकाकुल वातावरणात धार्मिक परंपरेनुसार विधी पार पडले. यावेळी परिसरात भावनिक आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित कार्यकर्ते, समर्थक आणि ग्रामस्थांनी स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करत आपल्या भावना व्यक्त केल्या. कोणतेही औपचारिक भाषण न करता शांततेत आणि श्रद्धेने हा विधी पार पाडण्यात आला.

कार्यकर्त्यांनी यावेळी “अजितदादा अमर रहे, अमर रहे”, “एकच दादा अजितदादा” अशा जोरदार घोषणा देत आपल्या भावना व्यक्त केल्या. संपूर्ण परिसरात शोक, श्रद्धा आणि भावनिक वातावरण अनुभवायला मिळाले. धाम नदीच्या तीरावर पार पडलेला हा विधी अत्यंत भावनिक वातावरणात शांततेत संपन्न झाला. उपस्थित नागरिकांनी स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रती आदर व्यक्त करत त्यांना अंतिम श्रद्धांजली अर्पण केली.

या प्रसंगी माजी आमदार राजू तिमांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) उपाध्यक्ष संदीप भांडवलकर, रोशन राऊत विधानसभा संघटक (शिवसेना) माजी पंचायत समिती सदस्य प्रमोद लाडे, ग्रामपंचायत सदस्य मोरेश्वर हलके, सामाजिक कार्यकर्ते जयात गोमासे, अशोकराव भट, विलास धावणे, योगेश लेंडे, निलेश धाकतोड, यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!