
वर्धा : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना आता वर्धा जिल्ह्यातून सुटका मिळणे अशक्य झाले आहे. कारण वर्धा आरटीओ कार्यालयाच्या इंटरसेप्टर वाहनावर अत्याधुनिक ‘रडार प्रणाली’ बसविण्यात आली असून ती प्रत्यक्ष कार्यान्वित झाली आहे. या प्रणालीमुळे वाहनधारकांकडून होणारा नियमभंग काही सेकंदांत टिपला जाऊन संबंधित वाहनधारकाच्या मोबाईलवर थेट ई-चालान पोहोचणार आहे.
पूर्वी वर्धा जिल्ह्यात वाहतूक नियंत्रणासाठी केवळ स्पीडगन प्रणाली वापरात होती. त्याद्वारे तासाला अवघे १५ ते २० ई-चालान जारी होत होते. मात्र नव्याने बसविण्यात आलेल्या रडार प्रणालीमुळे तासाला तब्बल ७०० ते ८०० ई-चालान तयार करता येणार आहेत. यासाठी वाहनांना थांबवण्याची गरज नसून, रडार प्रणाली वाहनांचा वेग, नंबरप्लेट आणि छायाचित्र कॅप्चर करून थेट दंडाची नोंद करणार आहे. चालकाने सीट बेल्ट लावला आहे का, दोनचाकीवर हेल्मेट आहे का, वाहन धोकादायक पद्धतीने चालविले जात आहे का, हे सर्व तपासले जाईल.
या यंत्रणेची क्षमता तब्बल ५०० मीटरपर्यंत आहे. त्यामुळे लांबून येणाऱ्या वाहनाचीही नोंद घेऊन त्याचा वेग किती आहे याची अचूक माहिती मिळते. नियमभंग झाल्यास अवघ्या काही सेकंदात संबंधित वाहनधारकाला दंडाचे ई-चालान मोबाईलवर पाठविले जाते. त्यामुळे वाहतूक पोलीस अथवा आरटीओ कर्मचाऱ्यांना वाहन थांबविण्याची आवश्यकता राहणार नाही.
राज्यातील प्रत्येक आरटीओ कार्यालयाला किमान एका वाहनावर ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत वर्धा आरटीओच्या वाहनावर रडार प्रणाली बसविण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असून, त्याचा प्रत्यक्ष अंमल सुरू झाला आहे. या प्रणालीमुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई अधिक कडक आणि त्वरित होणार असून, वर्धा जिल्ह्यातील रस्त्यांवर वाहतूक शिस्त प्रस्थापित होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
रडार प्रणाली विशेष?
वर्धा आरटीओच्या इंटरसेप्टर वाहनावर ‘रडार प्रणाली’ कार्यान्वित
तासाला ७००–८०० ई-चालान करण्याची क्षमता
५०० मीटर अंतरावरून वाहनाचा वेग व नंबर नोंद
सीट बेल्ट, हेल्मेट, धोकादायक ड्रायव्हिंगवर थेट नजर
वाहन थांबवण्याची गरज नाही – फोटो कॅप्चर करून थेट ई-चालान
वाहतूक शिस्तीला मिळणार चालना
प्रतिक्रिया…
“रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि नागरिकांमध्ये वाहतूक शिस्त निर्माण करणे हा रडार प्रणालीचा मुख्य उद्देश आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे नियमभंग करणाऱ्यांवर तात्काळ व पारदर्शक कारवाई शक्य होणार आहे. वाहनधारकांना थांबवण्याची गरज नसल्याने वाहतुकीचा खोळंबा टळेल. वेगमर्यादा, हेल्मेट व सीट बेल्ट यांचे पालन करण्याची सवय लागावी यासाठी ही प्रणाली प्रभावी ठरेल. नागरिकांनी दंडाच्या भीतीपोटी नव्हे, तर स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी नियम पाळावेत.
स्नेहा मेढे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा


























































