
पवनार : काळ कितीही पुढे गेला, आयुष्याची वळणे कितीही बदलली तरी शाळा, शिक्षक आणि बालमैत्रीच्या आठवणी कधीच पुसल्या जात नाहीत, याचा प्रत्यय पवनार येथील बाबुरावजी बांगडे विद्यालयात आला. सन १९९९–२००० च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २५ वर्षांनंतर एकत्र येत आयोजित केलेल्या स्नेहमेळावा व शिक्षक सत्कार समारंभाने संपूर्ण परिसर भावनिक झाला.
या विद्यालयात शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज डॉक्टर, अभियंते, शिक्षक, वकील, उद्योजक अशा विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील या शाळेने समाजाला दिलेले हे योगदान असल्याची भावना यावेळी व्यक्त झाली. आपल्या यशामागे शिक्षकांचे संस्कार, शिस्त आणि मार्गदर्शन असल्याचे सांगत माजी विद्यार्थ्यांनी गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमात शाळेतील शिक्षकवृंदांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. सत्कार स्वीकारताना अनेक शिक्षक भावूक झाले. विद्यार्थ्यांनी वर्गातील गमती-जमती, शिस्तीचे धडे, अभ्यासातील संघर्ष आणि शिक्षकांचे प्रेमळ पण ठाम मार्गदर्शन यांची आठवण करून दिली.
शिक्षकवृंदांनीही आपल्या विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत, विद्यार्थी समाजात चांगले नागरिक म्हणून उभे राहतात, हेच शिक्षकांचे खरे यश आहे. पुढील पिढीनेही मेहनत, नीतिमत्ता आणि संस्कार जपत वाटचाल करावी, असा संदेश दिला. या स्नेहमेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक विद्यार्थिनी विवाहानंतर बाहेरगावी व बाहेर जिल्ह्यात स्थायिक झाल्या होत्या. अनेकांचा परस्पर संपर्क पूर्णतः तुटला होता. मात्र, तरीही सर्वजण या कार्यक्रमासाठी एकत्र आले. २५ वर्षांनंतर बालमित्र–मैत्रिणी पुन्हा भेटल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, गप्पा रंगल्या आणि हरवलेली मैत्री पुन्हा जुळली.
या भावस्पर्शी स्नेहमेळाव्याचे प्रमुख आयोजक सुभाष पाटील, पंकज मगर, सतीश उमाटे, दीपक धनविज, हरीश ठोंबरे तसेच सर्व मित्र–मैत्रिणी होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष दादाजी बांगडे होते. प्रमुख अतिथी म्हणून चांदुजी बांगडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून देवुळकर सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मार्गदर्शक म्हणून दामोदरजी राऊत सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सर्वांच्या सहकार्यामुळे हा स्नेहमेळावा अत्यंत यशस्वी व संस्मरणीय ठरला.
आयोजकांची विशेष मेहनत….
तब्बल २५ वर्षांनंतर सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणणे हे मोठे आव्हान होते. अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी बाहेरगावी व बाहेर जिल्ह्यात स्थायिक झाले होते, तर अनेकांचे परस्पर संपर्कही तुटले होते. मात्र आयोजकांनी जुन्या नोंदी, मित्रमंडळी, सोशल मीडियासह वैयक्तिक ओळखींच्या माध्यमातून मोबाईल क्रमांक शोधून काढले. सतत संपर्क, समन्वय आणि संयोजनातून सर्वांना एकत्र आणण्यात आयोजकांना यश आले. या मेहनतीमुळेच स्नेहमेळावा संस्मरणीय ठरला.



























































